Thursday, March 9, 2017

देहू-संत डॉ. मापुसकर: एक कर्मयोगी

देहू-संत डॉ. मापुसकर : एक कर्मयोगी

डॉ मापुसकरांचा व माझा परिचय सुमारे ४० वर्षांचा. प्रत्यक्ष भेटीगाठी कमीच झाल्या पण सार्थक झाल्या. फोनवर बोलणे थोडेसे अधिक पण ते ही खूप नाही. मात्र पहिल्या भेटीपासून माझ्या मनातली प्रतिमा हीच की संत गाडगेबाबांचे ग्रामसफाईचे व्रत आणि संतश्रेष्ठ तुकारामांची निरलस व्यावहारिक त्यांच्यात एकवटली होती. शिवाय वैज्ञानिक दृष्टिकोण आणि प्रयोगशीलता तर होतीच होती. आरोग्य सेवा देता देताच गावक-यांना स्वच्छतेचे एक नवे वळण हा संत कधी लाऊन गेला ते कुणाला सहजी कळणार नाही.

त्यांचे प्रयोग गावांतील लोकांनी उघडयावर शौच करू नये, त्याऐवजी संडासांचा प्रयोग करावा यासाठी होते व तेही १९५५ इतक्या पुरातन काळी. आज ६० वर्षे उलटून गेल्यावरही अगदी मारे अमिताभ बच्चनसारखा ब्रॅण्ड अम्बॅसेडर आणून सरकारला ही कल्पना रुजवावी लागत आहे. या एकाच गोष्टीवरून त्यांच्या कामाचे महत्व कळते.

मी १९८१ ते १९८३ या काळात औरंगाबाद व सांगली जिल्हा परिषदांवर मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले. त्या काळांत गोबर गॅस तंत्र नुकतेच पुढे येऊ लागले होते व त्या योजनेवर शासनाचा भर होता. त्या आधी मी श्री मणिभाई देसाई यांच्या भारत अॅग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशनच्या गोशाळेत त्यांचे मोठे गोबर गॅस संयत्र पाहिलेले होते. शिवाय रायगड जिल्हयातील कृषितज्ज्ञ श्री जयंत पाटील यांच्या संस्थेत मु्क्कामी गेले असताना तिथे श्री अप्पासाहेब पटवर्धन यांच्या डिझाइन बरहुकूम चराचे संडास देखील पाहिले होते.

दुस-या बाजूचे चित्र पूर्णतः वेगळे होते. माझ्या लहानपणी मी पाटीचे संडास पाहिलेले आहेत. पहिल्या प्रथम आमच्या घरांत फ्लशचा संडास आला आणि मैलावाहन थांबले तेंव्हा किती बरे वाटले होते. फ्लश केल्यावर सर्व मैला व पाणी वाहून सेप्टिक टॅंक पर्यंत जात असे. तिथे घन पदार्थाची माती होऊन पाणी सोकपीट मधे पाठवले जाई. तिथे ते जमीनीत मुरत असे. पंधरा -वीस वर्षात कधीतरी या सेप्टिक टॅंक व सोकपीट ची साफ- सफाई करावी लागेल हे आम्हाला सांगितले होते. पण प्रत्यक्ष तसे करावे लागलेले मी पाहिले नाही. टँक व सोकपीट भरपूर मोठे असले तर साफसफाई देखील पुढे ढकलली जाऊ शकते.

मुंबई सारख्या मोठया शहरांत मात्र जागे अभावी हे तंत्र चालू शकत नाही. तिथे शौचालयांना ड्रेनेजला जोडावेच लागते आणि सर्व ड्रेनेजमधील मैला एखाद्या केंद्रावर आणून त्याची शुद्धिप्रक्रिया करावी लागते. ही प्रक्रिया कार्यक्षम राहण्याकडे दुर्लक्ष करुन चालते व दुर्लक्ष केलेही जाते कारण सर्व घाण मोठया जलप्रवाहात सोडून देण्याचा सोपा पर्याय उपलब्ध असतो. कालांतराने सर्वच मोठया शहरांमध्ये नद्यांचे प्रवाह दूषित आणि अतिदूषित होऊ लागलेले आपण पहात आहोत. शिवाय त्या नद्यांमध्ये मैल्याबरोबरच हार्पिक इत्यादि डिटर्जंट लक्षवधी टनांच्या प्रमाणात मिसळले जात आहेत व नदीपात्रतील जलीय जीवसृष्टीची अतोनात हानी करत आहेत. गावांत तसे तर शहरात हे असे चित्र.

एकूण लहानपणी फ्लश संडासांमुळे निर्माण झालेल्या ज्या सोईमुळे मी प्रभावित झाले होते त्यांच्या अफाट संख्यावृद्धिनंतर किती मोठया समस्या निर्माण झाल्या आहेत हे लक्षांत येत आहे.

एकीकडे शहरांमधील सोय, तिचे केंद्रीकरण व त्यातून जलप्रदूषणाच्या समस्या आहेत. तर दुसरीकडे खेडोपाडी लोकांना शौचालये बांधावीत व उघडयावर मलविसर्जन करु नये यासाठी शासन प्रयत्नशील आहे. पण शासनाचे प्रयत्न गांवातील लोकांनी उघडयावर शौच करु नये, त्याऐवजी संडासांचा प्रयोग करावा यापुरतेच मर्यादित आहेत.
डॉ मापुसकरांनी शौचालये बांधून काढण्यासाठी अभियान चालवले ते १९५५-६५ इतक्या पुरातन काळी. त्यालाही कालांतराने ऊर्जानिर्मितीची जोड देऊन टाकली. शासकीय योजना आणि डॉ. मापुसकरांची पद्धत या मधे हा महत्वाचा व मूलभूत असा फरक आहे.

खूपदा गावक-यांकडे शौचालय बांधण्याइतकी मोठी जागा नसते. मग सेप्टिक टॅंक, सोक पीट इत्यादीच्या अतिरिक्त जागेबद्दल बोलायलाच नको, खेडे गावांमधे एकत्रीकृत ड्रेनेज लाइन टाकणेही अति खर्चिक व शासकिय संस्थांना न परवडणारे असते, मग ती ग्राम पंचायत असो अगर क वर्गातील (छोटी) नगर पालिका. या बाबींचा विचार डॉ मापुसकरांनी केला होता. अप्पासाहेब पटवर्धन यांच्या दोन खड्यांच्या डिझाइनमधे थोडे फरक करून व जागेची जमेल तेवढी काटकसर करून आणि तरीही मलविघटनाला जागा अपुरी पडणार नाही याची दक्षता घेऊन त्यांनी सुधारित डिझाइन तयार केले. अप्पासाहेबांच्या डिझाइन मधे मलापासून थेट माती तयार होई पण मापुसकरांनी प्रयोगातून हे सिद्ध केले की खालच्या खड्डयाचा आकार, रचना, त्यातील पाण्याचे मिश्रण इत्यादि कसे असावे जेणेकरून त्यांत बायोगॅस बनू शकतो. म्हणजेच अंतिमतः माती होण्याआधी त्यांच्या डिझाइनमधे मलविघटनातून बायोगॅस वेगळा काढता येत असे. तो पाइपद्वारे एखाद्या शेगडीच्या बर्नरपर्यंत आणून तिथे पेटवला जाऊ शकत असे. १९७५ नंतर स्वयंपकासाठी LPG गॅस मिळू लागला होता व लोकप्रिय झाला होता. त्याच शेगडीला मापूसकरांचा गॅस पुरवून त्यावर काम होऊ शकते हे देखील त्यांनी प्रयोगातून दाखवून दिले. इतकेच नव्हे तर देहू गावक-यांना परोपरीने समजावून देत त्यांना अगदी लहान जागेत शौचालये बांधून दिली.

माझा त्यांचा प्रथम परिचय १९८७ मधे झाला. माझे पोस्टिंग पुण्यातच होते आणि सांगलीत गोबरगॅस योजनेत केलेल्या कामावर निष्ठा आणि मोह अजून चालूच होते. त्या तंत्रातील दुवे समजू लागले होते व ऊर्जावापरामधे गोबरगॅसचे महत्वही पटले होते. म्हणून एकदा ठरवून देहू गावी जाऊन मी त्यांची ओळख करून घेतली व त्यांचे प्रयोग समजाऊन घेतले. अप्पासाहेबांच्या डिझाइन मधे फरक करून मानवी विष्ठेतून बायोगॅस निर्माण हे त्यांच्या प्रयोगांचे वैशिष्ट्य होते. असे बांधलेले संडास प्रत्यक्ष पहायला मिळतील का हा प्रश्न विचारल्यावर त्यांनी थोडे थोडके नाही तर दीडशेहून अधिक संडास एकट्या देहू गांवात बांधून दिले आहेत व ते सर्व मला पहाता येतील असे सांगितले. लगेचच त्यांनी निरोप पाठवले आणि मग आम्ही गावभर फिरून आलो.

या गावफेरीत बायोगॅस प्लांटसह किंवा त्याशिवाय संडास बांधून दिले आहेत अशा कित्येकांना आम्ही भेटलो. डॉ मापूसकरांनी किमान ८ घरांत स्वतः मला सर्व बांधकाम दाखवून त्याचा सिद्धांत समजावून दिला. त्या त्या घरातील वापर करणाऱ्यांचा फीडबॅकही मला घेता आला. त्यामधे एक विधवा बाईही होत्या ज्यांनी स्वतःचा संडास वापरण्यासाठी शेजाऱ्याला भाड्याने दिला होता व बायोगॅस स्वतः वापरीत असत, अशा प्रकारे त्यांना पूरक उत्पन्नाचे एक साधन झाले होते. डॉक्टरांनी अजून अशी काही घरे दाखवली जिथे घरांतील लोकांना बायोगॅस वापरण्याबद्द्ल त्यांना पटवून देता आले होते. अशा त-हेने त्यांच्या इंधनाची सोय होत होती .मात्र ज्यांना हे मंजूर नव्हते तिथे डॉ. त्यांच्या मतपरिवर्तनाच्या भानगडीत पडले नाहीत कारण लोकांनी उघडय़ावर शौचास न जाता नीटनेटकेपणाने शौचालये बांधून त्यांचा वापर करावा ही जास्त गरजेची बाब होती.

त्यांच्या बायोगॅस-सहित शौचालयाचे डिझाइन असे होते की डायजेशन चेंबर हे शौचालयाच्या Vertically खाली नसून थोडे बाजूला सरकलेले असे. या डायजेशन चेंबरला व्यवस्थित फरशा अगर सीमेंट स्लॅब टाकून बंद केलेले असे त्यामुळे ती जागा वापरता येत असे. गावांमधे घरे व त्यांच्या सोबत उपलब्ध असलेली जागा लहान असते तिथे हे डिझाइन उपयोगाचे होते. थोडी जास्त जागा असेल तिथे ते दोन डायजेशन चेंबर बांधायचा सल्ला देत जेणे करून एक चेंबर भरल्यावर त्याला तसाच बंद करून दुस-या डायजेशन चेम्बरचा वापर करण्यांत यावा. या प्रकारामुळे ४ ते ६ महिन्यांनंतर पहिल्या चेंबरमधून उत्तम प्रतीचे खत तयार होऊन मिळत असते. घरमालकाला मंजूर असेल तिथे डायजेशन चेंबरमधे बायोगॅस निर्माण होऊन वापरता येण्याची सोय केली जाई.

मापुसकर हे तळमळीचे डॉक्टर होते आणि रोग्यांबाबतची त्यांची तळमळ गावक-यांना समक्ष दिसत असे. शौचालयांची मोहीम हाती घेण्याआधी उघडयावर शौच केल्याने गावांतील पाणी, माती, हवा, दूषित होतात व साथीचे रोग पसरतात हे त्यांनी गावकऱ्य़ांना सप्रमाण दाखवून दिले होते. त्यासाठी शेकडो स्टूल सॅम्पल्स घेतली व त्यामधे असलेले जंत मायक्रोस्कोपच्या सहाय्याने गावकऱ्य़ांना दाखवून दिले. तसेच मातीचीही सँम्पल्स घेऊन त्यांतील जंतही समक्ष दाखवले. त्यांची तळमळ व ते बिना श्रमांचा पैसे घेणार नाहीत यावर लोकांची श्रद्धा होती. म्हणूनच त्यांच्या डिझाइन प्रमाणे त्यांनीच संडास बांधून द्यावेत, खर्च आम्ही सोसू असे गावक-यांनी चालवून घेतले व त्यांना योग्य असा प्रतिसाद दिला. त्यांच्या डिझाइन मधील एक खड्डा अंडरग्राउंड असायचा व त्यांतच मलविघटन होऊन गॅस बनत असे. हा खड्डा पहिल्या खड्डच्या थेट खाली नसून थोडा वेगळा सरकलेला असे व त्यावर फरशी, सिमेंटचे बांधकाम केल्याने व्यवस्थित झाकलेला असे. त्यावर बसताना आपण एका बायोगॅस प्लांटच्या छतावर बसलो आहोत हे सांगितल्या शिवाय कोणाला कळतही नसे.

डॉक्टरांनी त्यांच्या शौचालयाच्या डिझाइनला मलप्रभा है नांव दिले होते. पुढे काही वर्षांनंतर त्यांनी "अप्पा पटवर्धन पर्यावरण व सफाई तंत्रनिकेतन" या नावाची संस्था स्थापन केली व तिच्यामार्फत या तंत्राचे प्रशिक्षण देऊन गवंडी आणि तंत्रज्ञ तयार करावेत अशी योजना आखली.

१९९८-२००१ या काळांत मी राष्टरीय महिला आयोग दिल्ली मधे जॉईंट सेक्रेटरी होते. तेंव्हा मी व डॉक्टरांनी असा प्रयत्न केला की त्यांचे डिझाइन व टेकनीक गावकरी स्त्रियांनी शिकून घ्यावे व त्यानुसार गावांमधे बायोगॅस युक्त शौचालयांचे बांधकाम करावे. यासाठी वनस्थली, पुणे या संस्थेतील कांही महिलांचे प्रशिक्षण देहू गांवी करायचा प्रयत्न आम्ही केला. वनस्थळीने निवड केलेल्या सहा ग्रामीण महिलांना देहू गावी राहून प्रशिक्षण घेता येईल अशी सांगड घालून दिली होती. प्रशिक्षणाचा खर्च राष्ट्रीय महिला आयोगाने द्यावा अशी कल्पना होती. त्याप्रमाणे सहा महिला तिथे राहिल्या देखील. मात्र आम्हाला हवे तसे महिला प्रशिक्षण होऊ शकले नाही. मला वाटते की या कार्यक्रमाचे दोन महत्वाचे कच्चे दुवे होते. दिलेल्या डिझाइन प्रमाणे प्रत्यक्ष शौचालये बांधणारे गवंडी यांची नवा होती. त्यांनी प्रशिक्षणार्थी महिलांना शिकवायचे असेल तर कुठेतरी प्रत्यक्ष साइट वर काम चालू असणे आणि तिथे या महिलांना प्रत्यक्ष काम करून पहायला मिळणे याची सांगड घालावी लागते. ते जमले नाही. शिवाय मला थोडेसे असेही जाणवले की प्रशिक्षित गवंडी आपले बांधकाम इतरांना शिकू देऊ इच्छित नव्हते कारण आपले गिऱ्हाइक निसटेल अशी भीती त्यांनी बाळगली असावी.

दुसरा कच्चा दुवा होता तो गवंडी यांच्या अप्रगल्भतेचा. ज्यांच्या घरांत शौचालय बांधून द्यायचे त्या प्रत्येक घराची परिस्थिती वेगळीचते असणार, तेथील सदस्यसंख्या, जागेची उपलब्धता, तिचा आकार इत्यादी वेगवेगळे असणार. अशा त-हेने परिमाणे बदलली की डिझाइन मधे कांय बदल करायचे आणि का याचे सैद्धान्तिक ज्ञान त्या गवड्यांना नव्हते. त्यामुळे होणा-या बांधकामांचे डिझाइन स्वतः डॉक्टरांनी करून देईपर्यंत गवड्यांना थांबून रहावे लागे. त्याच्या कामाचे सुपरव्हिजनही डॉक्टरांनाच करावे लागे.
थोडक्यांत अप्पासाहेब पटवर्धनांच्या नावे काढलेली ही प्रशिक्षणसंस्था खूप यशस्वी झाली असे मला तरी वाटले नाही .पण त्यासाठी मापूसकरांचे काम जाणणारे लोक कमी पडले असे मला वाटले व त्यांत माझाही नंबर लागतो.

इतके असूनही त्यांचे काम मात्र निश्चितपणे अधिकाधिक लोकांपर्यंत पोचावे व इतरांना शिकवले जावे अशाच प्रकारचे होते. मला खंत वाटते कि केंद्र शासनाच्या अपारंपरिक ऊर्जा विभागातील एक दोन अधिकारी वगळता या कामाचे महत्व कोणाला समजले नाही. त्यामुळे त्या विभागाच्या तसेच राज्य शासनाच्याही कित्येक समित्यावर डॉक्टरांना सल्लागार म्हणून घेतले असूनही त्यांच्या डिझाइनचा प्रसार व्हावा यासाठी प्रतिसाद मिळाला नाही. दोघांसाठी जी विन-विन सिच्युएशन होऊ शकली असती तसे नाही घडले.

२००२ मधे माझ्याकडे केंद्रातील पेट्रोलियम मंत्रालयाअंतर्गत ऊर्जा संरक्षण या विभागाचे काम आले. तेव्हा आम्हीं दूरदर्शन वर ऊर्जा संरक्षणाची एक साप्ताहिक सीरीयल करू लागलो. तिचे नावं खेल खेलमें बदलो दुनिया। त्यामधे ऊर्जा वापरायच्या निरनिराळ्या थीम्स वर ४-६ मिनिटांची एक व्हीडियो क्लिप तयार करून ती विद्यार्थांना दाखवणे व त्यावर प्रश्न विचारणे असे स्वरूप होते. या सीरीयलसाठी आम्हीं मापुसकरांचे नेमके डिझाइन व टेकनीक दाखवणारी एक पाच मिनिटांची वीडीयो क्लिप केली होती. कालांतराने त्यांच्या इतर चाहत्यांनी त्यांच्या कामाची एक सविस्तर वीडीयो फिल्म करून घेतली आहे.
डॉ मापूसकर एक निष्णांत डॉक्टर होते. ते डॉक्टर झाले त्या काळांत खूप मोठे स्पेशलायझेशन झालेले नव्हते. त्यामुळे त्यांची ब्रांच जरी सामाजिक आरोग्य ही असली तरी ते एक चांगले जनरल फिजिशयन होते व वेळ प्रसंगी त्यांना शस्त्रक्रियाही करावे लागे. त्या काळांत लोकसंख्या वाढ थोपविण्यासाठी त्यांनी पुरूष नसबंदीच्या शस्त्रक्रियाही मोठ्या प्रमाणावर केल्या. अधून मधून तर चक्क मुंबईच्या VT स्टेशनवरच त्यांनी पुरूष नसबंदी कॅम्प चालवलेले असत. एकीकडे असली कामं, दुसरीकडे सामाजिक आरोग्याबाबत, विशेषतः जंत-निर्मित रोगराईबाबत गांवकऱ्यांचे प्रबोधन -- त्यासाठी गांवोगावी व्याख्याने देणे, अशा निखालस डॉक्टरी कामासोबतच त्यांनी सिविल इंजिनियरिंग आणि बायोगॅस तंत्र आत्मसात करून वाढीला लावले हे निश्चितच महत्वाचे होते.

त्यांचे काम सिंहगड विद्यालयातील प्राध्यापक श्री समीर शास्त्री यांनी शिकून घेतले आहे त्यामुळे अशा बायोगॅस प्लांटचा अधिकाधिक वापर होत राहिल अशी मी आशा बाळगते.

डॉ. मापूसकरांची व माझी शेवटची भेट ही केवळ सदिच्छा भेट होती. माझी बंगळुरु येथे नोकरी चालू होती. एकदा त्यांचा निरोप मिळाला की सहजच भेटून गप्पा मारण्याची इच्छा आहे. मग मीही एका वीक-एण्डला पुण्यांत आले असतांना देहूला त्यांना भेटून आले. तेंव्हा ते थकले असले तरी स्वतःच्या प्रयोगांबद्द्ल उत्साही होते. त्यांनी त्यांचे आयुष्य समाजसेवेसाठी, समाजाला नवा दृष्टी देण्यासाठी व त्याबरहुकूम कामे करण्यासाठी वापरली होते. एका तृप्तीची, समाधानाची भावना व शांत आनंद त्यांच्या बोलण्यात होता. पश्चिमेकडे झुकत चाललेल्या सूर्याच्या मवाळ प्रकाशांत त्यांचा उजळलेला समाधानी चेहरा मला नेहमीच स्मरणांत राहील. त्या भेटीलाही - वर्षे उलटली आणि एक दिवस त्यांना श्री अबदुल कलामांच्या हस्ते निर्मल ग्राम पुरस्कार मिळाल्याची बातमी कळली. मग एकदा आम्हा दोघांचे परिचित श्री जोशींकडे गप्पा करतांना कळले की, डॉ. मापूसकर आता आपल्यांत नाहीत. पण वाईट नाही वाटले. त्यांच्या कृतकृत्य जीवनाची अखेर समाधानातच झाली होतीआणि आता एवढ्या वर्षांनंतर अखेर शासनाला त्यांच्या कामाची जाणीव झालीी आणि त्यांना २६ जानेवारी २०१७ च्या गणतंत्रदिवशी मरणोत्त्र पद्मश्री हा सन्मान बहाल करण्यात आला. त्यांचा समाधानी आत्मा अधिकच उजळला असणार.


---------------------------------------------------------------------------------------------------