Monday, August 31, 2020

दिलखुलास मुलाखत १ - कौशल्य शिक्षणावर काही योजना

Monday, March 2, 2020

चाटगाव सौर ऊर्जा प्रकल्प

चाटगाव: मराठवाड्याचा उगवता सूर्य

-- संजीव उन्हाळे

या आठवड्यात सगळ्यांना अचंब्यात टाकणारी अचाट घटना घडली. एरव्ही औरंगाबादकडे येणारे परदेशी पर्यटक यावर्षी पार हडकले. अर्धे पर्यटक शिर्डीला गेले तर उरलेले कोरोनाच्या भीतीने इकडे फिरकलेच नाहीत. अशा स्थितीत १३२ जर्मन, फ्रेंच आणि झेक रिपब्लिकचे तज्ज्ञ गुंतवणुकदार येणार, अशी बातमी धडकली. अजिंठा-वेरूळला जाण्याऐवजी ते धारूर तालुक्यातील चाटगावला पाच मोठ्या बसेस करून निघाले. मग प्रशासकीय यंत्रणेची शोधाशोध सुरू झाली. शेवटी असे कळाले की, भारतातील जे मोठे सौरउर्जा प्रकल्प आहेत त्यापैकी चाटगाव एक आहे. जवळपास तीनशे हेक्टर परिसरात तब्बल अडीच लाख पॅनल्स लावून दररोज ५० मेगावॅट वीजेची निर्मिती याठिकाणी २०१७ पासून सुरू झाली. ही वीज जवळच्या तेलगाव सबस्टेशनला पुरविली जाते. जवळपास शंभर स्थानिकांना या प्रकल्पामध्ये सामावून घेण्यात आले असून इतर चाळीस जणांचा तांत्रिक कर्मचारीवर्ग आहे. थॉमस लॉयड ग्रुपचे अध्यक्ष मायकेल सेज यांनी या प्रकल्पासाठी पुढाकार घेतला. त्यांनी सोलार अरायजेस इंडिया प्रोजेक्ट प्रा.लि. या कंपनीला जागतिक उर्जा कार्यक्षमता व अक्षय उर्जा निधीच्या माध्यमातून २०० कोटी रूपयांचा प्रारंभिक निधी दिला. त्यात एलअ‍ॅण्डटी, कोटक-महिंद्रा ग्रुप या सर्वांनी मिळून ३७५ कोटींची गुंतवणूक केली. प्रकल्प सुरू झाल्यापासून या कंपनीने एक पथ्य पाळले. ना उद्घाटन केले ना समारंभ. ना कोणत्या पुढा-या पुढे दात वेगांडले ना कोणत्या मंत्र्याला निमंत्रित केले. पहिल्या दिवसापासून नियमितपणे महावितरणला वीजपुरवठा मात्र केला. त्यामुळे ही कंपनी चांगलीच फायद्यात आहे. भुसंपादन करण्याच्या प्रक्रियेपासून सुनिलकुमार मुख्य कार्यकारी संचालक म्हणून काम करीत आहेत. प्रकल्प उभारताना त्यांनी वाजवी दरात मिळणारी चाटगावची जमीन आणि जवळचे तेलगाव सबस्टेशन पाहिले.
उलट चाटगावच्या शाळेला या १३२ जर्मन लोकांनी भेट दिली. कंपनीने शाळेत सौरदिवे लावले असून अध्यापनाच्या नवीन पध्दतीसाठी अनेक साधने दिली आहेत. हे सर्व पाहून थॉमस लॉयड ग्रुपचे अध्यक्ष मायकेल सेज यांनी ’’यु आर ऑल सो अमेझिंग,’’ असे गौरवोद्गार काढले. महत्त्वाची बाब म्हणजे महाराष्ट्रासाठीच या कंपनीकडून आठवडाभरात १०० मेगावॅटचा प्रकल्प मंजुर केला जाणार आहे. अर्थात, शासकीय स्तरावर याचा कोणालाही थांगपत्ता नाही.
 देणा-याचे हात हजार, अन् फाटकी आमुची झोळी, अशी आमची अवस्था आहे. जरी एक दशकापासून कमी-अधिक पाऊस झाला, शेतीमध्ये काहीही उरले नाही, अशी नैराश्य भावना असली तरी या विभागाची सौरउर्जेची श्रीमंती मोठी आहे. कोणीही मराठवाड्याला मागास म्हणो, पण वर्षातील प्रदीर्घ काळ लखलखता सुर्यप्रकाश असणारी ही भुमी आहे. या सुर्यप्रकाशातून अखंड वीजनिर्मिती होवू शकते, हे थॉमस लॉयड ग्रुपने सिध्द केले आहे. केवळ सौरउर्जेची शेती केली तरी ती खूप मोठी गोष्ट आहे. तथापि, आमच्या सरकारला टाटा, अदानी या भांडवलदारांची वीज प्रिय असते. शेतक-यांच्या गटांनी वीजनिर्मितीचे धाडस केले तर महावितरण अशी वीज घेण्यास तयार नसते. सौरउर्जेचे पॅनल आणि त्याचे भाग इतके महाग करून ठेवले आहे की, सामान्य शेतक-याला ते परवडत नाही. बेंगलुरूमध्ये सेल्को फाऊंडेशनने सर्वसामान्यांच्या घरात सौरउर्जा तर पुरवली आहेच पण सौर उद्योजकासाठी लागणारे सर्व प्रशिक्षण पुरवले आहे. दुर्दैवाने या सौर शिक्षण करणा-या सेल्को फाऊंडेशनला केंद्र सरकारने फारशी मदत केली नाही. सेल्कोच्या धर्तीवर मराठवाड्यात असे फाऊंडेशन निर्माण झाले तर सौरशेतीतून वीजनिर्मिती करणे सोपे आहे. सेल्कोचे थॉमस आणि रामचंद्र पै ही जोडगोळी मराठवाड्यात येवून गेली तेव्हा त्यांनी पाहिले की, या भागात पावसाचे दिवस कमी असले तरी सुर्यप्रकाशाचे दिवस जास्त आहेत. या भागातील दैन्य हवामानबदलामुळे आणखीनच वाढणार आहे. त्यासाठी सौरउर्जा हा एकमेवाद्वितीय पर्याय आहे. मॅगेसेसे पुरस्कार विजेते हरिष हंडे यांच्या मते गरीब लोकांच्या घरापर्यंत ही सौरउर्जा जावून यासाठी शेकडो सौर उद्योजक तयार होण्याची गरज आहे, असे म्हटले आहे. सेल्कोने टिव्ही, झेरॉक्स, पिठाची गिरणी अशा अनेक गोष्टी सौरउर्जेवर चालवून दाखविल्या आहेत. आदिवासी भागात मुलांना सौर कंदिलही पुरविले आहेत. या पाश्र्वभुमीवर मराठवाड्यात या घडीला अनेक शेतकरी वन्य प्राण्यापासून त्रस्त आहेत. रात्री शेतात हे प्राणी घुसले तर पिकांचा फडशा पाडतात. यासाठी सौर कुंपण हा एकमेव पर्याय आहे. यामुळे प्राण्याला झटका बसतो पण तो मरत नाही. कोणत्याही वन्यजीव कायद्याचे उल्लंघन होत नाही. लोहाराच्या भात्याला वीज पुरविण्यापासून ते पिठाच्या गिरणीपर्यंत सेल्कोने केलेले यशस्वी प्रयोग या भागात पुढे नेणे गरजेचे आहे. संपूर्ण मराठवाड्याला दररोज एकूण ३ हजार मेगावॅट वीज लागते. चाटगावच्या ५० मेगावॅट सौरउर्जेतून केवळ तेलगाव सबस्टेशनची थोडीफार गरज पूर्ण होते. सौरउर्जा निर्मितीमध्ये मराठवाडा स्वयंपूर्ण होईल इतकी उर्जा सूर्यदेव देत आहे. केवळ ती आपल्याला वीजेमध्ये परावर्तित करता येत नाही. सौरउर्जा निर्मिती हा कृषीक्षेत्रातील मोठा उद्योग होवू शकतो. जर महावितरणने हमी दिली तर बँकासुध्दा कर्ज देवू शकतात. मराठवाड्यातील वाढत्या नापिकीला सौरशेती हेच उत्तर आहे. चाटगावातील या कंपनीचे नामकरण तुल्लीतुलाई असे तामिळी भाषेत दिली असून त्याचा अर्थ उगवता सूर्य असा आहे. काही भांडवलदारांनी गुंतवणूक केल्यामुळे चाटगावचे अचाट काम आकाराला आले. पण, मराठवाड्यातील शेतीव्यवस्थेतला अंधार दूर करण्यासाठी या सूर्याला आपणच जागा करून दिली पाहिजे.